अपूर्णांकांची तोंडओळख

6 युक्त्या

वर्तमानपत्र वापरून अपूर्णांकांची तोंडओळख

वर्तमानपत्र

शिक्षिका: मुलांनो, आज हे वर्तमानपत्र आपल्याला काहीतरी शिकवणार आहे! 😄 हे बघा. वर्तमानपत्र किती मोठं आहे, नाही? आता मी ते अगदी मधोमध दुमडते. झालं! आता काय झालं?

विद्यार्थी: अर्धं झालं!

शिक्षिका: अगदी बरोबर! पूर्ण वर्तमानपत्राचे दोन समान भाग झाले. पण थांबा… आता या अर्ध्या वर्तमानपत्रालाच पुन्हा अगदी मधोमध दुमडूया. आता उघडून बघा… अरे वा! 😮 आता किती भाग दिसत आहेत?

विद्यार्थी: चार!

शिक्षिका: हो! चार समान भाग! म्हणजे प्रत्येक भाग हा पूर्ण वर्तमानपत्राचा कितवा भाग झाला?

विद्यार्थी: चौथा भाग!

शिक्षिका: बरोबर! म्हणजेच एक चतुर्थांश! पण जरा विचार करा… 🤔 पहिल्यांदा आपण एका पूर्ण वर्तमानपत्राला २ समान भागांत विभागलं. आणि त्या अर्ध्या भागालाच पुन्हा २ समान भागांत विभागलं. मग एकूण किती भाग झाले?

विद्यार्थी: चार!

शिक्षिका: म्हणून आजचा आपला छोटासा प्रश्न— “अर्ध्याचा अर्धा केला, तर काय मिळतं?” 😃 चला, आता वर्तमानपत्र बाजूला ठेवूया… आणि आपल्या आजूबाजूला अर्धा आणि चतुर्थांश कुठे कुठे दिसतोय, ते शोधूया!

छत्री वापरून अपूर्णांकांची तोंडओळख

छत्री

शिक्षिका: मुलांनो, ही छत्री बघा! ☂️ मी ती उघडते… आता नीट बघा. छत्रीच्या आत कितीतरी समान आकाराचे भाग दिसत आहेत. चला, सगळे मिळून मोजूया! एक… दोन… तीन… चार… असं करत करत सगळे भाग मोजा.

विद्यार्थी: [विद्यार्थी छत्रीचे समान भाग मोजतात.]

शिक्षिका: वा! म्हणजे आपल्या छत्रीत एकूण ___ समान भाग आहेत! आता या भागांपैकी मी ___ भाग निवडते… हे बघा, मी त्यांच्यावर खडूने खूण केली. आता सांगा बरं मी एकूण किती भाग निवडले?

विद्यार्थी: दोन!

शिक्षिका: अगदी बरोबर! 👏 पण आता आणखी एक मजेशीर प्रश्न— या छत्रीच्या एकूण भागांपैकी मी किती भाग निवडले आहेत? जरा विचार करा… 🤔 आज आपण हेच शोधणार आहोत!

फीत वापरून अपूर्णांकांची तोंडओळख

फीत

शिक्षिका: मुलांनो, माझ्याकडे ही लांब रिबीन आहे. 🎀 ही बघा… किती लांब आहे! आता मी ही रिबीन सारख्या पाच भागांत दुमडते. चला, मोजूया— एक… दोन… तीन… चार… पाच!

वा! आता आपली रिबीन पाच समान भागांत विभागली आहे. आता मी या पाचपैकी एक भाग वेगळा दाखवते. पाच भागांपैकी एक भाग म्हणजे तुम्हाला दिसतोय तो भाग आहे - एक छेद पाच.

आता अजून दोन भाग. आता एकूण किती भाग दिसत आहेत?

विद्यार्थी: तीन!

शिक्षिका: म्हणजे पूर्ण रिबीनचे किती भाग?

विद्यार्थी: पाचपैकी तीन!

शिक्षिका: छान! म्हणजे तीन छेद पाच! 😄

बाटली वापरून अपूर्णांकांची तोंडओळख

बाटली

शिक्षिका: मुलांनो, आज माझ्याकडे एक साधीशी पाण्याची बाटली आहे. पण ही बाटली आपल्याला एक मजेशीर गोष्ट शिकवणार आहे! 😄 हे बघा, बाटलीवर मी तीन खुणा केल्या आहेत. सगळ्यात खाली एक खुण… मधोमध दुसरी… आणि वर तिसरी.

आता आपण बाटलीत पाणी भरूया. पहिल्या खुणेपर्यंत पाणी भरलं तर… बाटलीचा किती भाग भरला असेल?

विद्यार्थी: एक भाग!

शिक्षिका: हो! म्हणजे तीनपैकी एक भाग - एक तृतीयांश! आता आणखी पाणी भरते… दुसऱ्या खुणेपर्यंत. आता किती भाग भरले?

विद्यार्थी: दोन भाग!

शिक्षिका: बरोबर! म्हणजे दोन तृतीयांश! आता शेवटची खूण… बाटली पूर्ण भरली! मग किती भाग भरले?

विद्यार्थी: तीन भाग!

शिक्षिका: म्हणजेच तीन तृतीयांश — म्हणजे पूर्ण एक! 😄 आता जरा विचार करा… एक तृतीयांश, दोन तृतीयांश आणि तीन तृतीयांश — हे आकडे बाटलीतल्या पाण्याबद्दल आपल्याला काय सांगतात? चला, आज आपण हेच शोधूया!

रूमाल वापरून अपूर्णांकांची तोंडओळख

रुमाल

शिक्षिका: मुलांनो, आता माझ्याकडे आहे एक साधा रुमाल. 🧣 चला, आधी तो नीट पसरूया. आता मी त्याचे कोपरे एकमेकांवर जुळवून तिरपे दुमडते. उघडून बघा… रुमालाचे दोन समान भाग झाले! म्हणजे काय झालं?

विद्यार्थी: अर्धा!

शिक्षिका: बरोबर! त्यालाच एक छेद दोन असंही म्हणतात. दोन भागापैकी एक भाग - अर्धा - एक छेद दोन. 👏 आता मी पुन्हा तिरपे दुमडते. पुन्हा एकदा कोपरे एकमेकांवर जुळवते. आता रुमाल उघडून बघा… अरे वा! 😮 आता किती समान भाग दिसत आहेत?

विद्यार्थी: चार!

शिक्षिका: हो! म्हणजे रुमालाचा प्रत्येक भाग चार समान भागांपैकी एक भाग आहे — एक चतुर्थांश किंवा एक छेद चार आता एक मजेशीर गोष्ट लक्षात घ्या. आपण रुमाल दुमडताना कधी कडा-कडा जुळवतो, तर कधी कोपरे-कोपरे जुळवतो. पद्धत वेगळी असली तरी आपल्याला मिळालेले भाग समानच असतात.

म्हणजे समान भाग करण्यासाठी नेहमी कडा सरळ जुळवायलाच हव्यात असं नाही… कोपरे जुळवूनही आपण वस्तूचे समान भाग करू शकतो! 😊

आता सांगा बरं— या चार समान भागांपैकी आपण दोन भाग घेतले, तर तो रुमालाचा कितवा भाग होईल? 🤔

फरशीवरच्या फुली-गोळ्यातून अपूर्णांकांची तोंडओळख

फरशी

शिक्षिका: मुलांनो, जरा खाली बघा! 😄 इथे ३ × ३, म्हणजे एकूण ९ फरशा आहेत. चला, सगळ्या फरशा मोजूया. एक, दोन, तीन… नऊ!

आता मी काही फरश्यांवर फुली करते. ✖️ आणि काही फरश्यांवर गोळा करते. ⭕ चला, आधी फुली केलेल्या फरशा मोजूया.

विद्यार्थी: पाच!

शिक्षिका: छान! एकूण फरशा किती आहेत?

विद्यार्थी: नऊ!

शिक्षिका: म्हणजे फुली केलेल्या फरशा नऊपैकी पाच. तर हा अपूर्णांक कोणता?

विद्यार्थी: पाच छेद नऊ

शिक्षिका: अगदी बरोबर! 👏 आता गोळा केलेल्या फरशा मोजूया.

विद्यार्थी: चार!

शिक्षिका: म्हणजे गोळा केलेल्या फरशा नऊपैकी चार. तर हा अपूर्णांक?

विद्यार्थी: चार छेद नऊ!

शिक्षिका: वा! 😄 आता सांगा बरं— फुली केलेल्या फरश्यांचा अपूर्णांक कोणता आणि गोळा केलेल्या फरश्यांचा अपूर्णांक कोणता?