त्रिकोणी पताकेची परिमिती मोजूया

त्रिकोणी पताकेची परिमिती मोजूया

त्रिकोणी पताका

शिक्षक: मुलांनो, बघा बरं, ही पताका कोणत्या आकाराची आहे?

विद्यार्थी: त्रिकोण!

शिक्षक: अगदी बरोबर, त्रिकोण! आता समजा, आपल्याला या पताकेच्या कडांना झालर किंवा सजावटीची पट्टी चिकटवायची आहे. तर ती झालर किती लांबीची घ्यावी लागेल, असं वाटतं तुम्हाला?

विद्यार्थी: माहीत नाही ...

शिक्षक: जरा विचार करा — पताकेला किती बाजू आहेत?

विद्यार्थी: तीन!

शिक्षक: बरोबर, तीन बाजू. मग झालर या तिन्ही बाजूंवरून जाणार, हो ना? म्हणजे झालरीची लांबी ही तिन्ही बाजूंच्या लांबीइतकी हवी, बरोबर?

विद्यार्थी: हो !

शिक्षक: चला मग, आता आपली पट्टी घ्या. पहिली बाजू मोजा — किती सेंटीमीटर आहे? आता दुसरी बाजू मोजा. आणि आता तिसरी बाजू मोजा. झालं? आता या तिन्ही बाजूंच्या लांबी तुमच्याकडे आहेत. पुढे काय करायचं?

विद्यार्थी: एकत्र बेरीज करायची !

शिक्षक: अगदी बरोबर! तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज केली, की तेवढी लांबीची झालर आपल्याला त्या पताकेसाठी लागेल. मुलांनो, दिलेल्या कोणत्याही आकाराच्या सगळ्या बाजूंच्या लांबीची बेरीज करणे, याला आपण परिमिती म्हणतो, काय म्हणतो?

विद्यार्थी: परिमिती!

शिक्षक: शाब्बास! पताका वेगळ्या आकाराची असेल , लहान मोठी असेल, तर प्रत्येकाची परिमितीसुद्धा वेगळी भरेल.