परिमिती

2 युक्त्या

दोरी आणि पट्टीने परिमिती मोजूया

दोरी आणि पट्टीने परिमिती मोजूया

दोरी आणि पट्टी

शिक्षक: मुलांनो, आपल्या वर्गातला हा फळा बघा. समजा आपल्याला या फळ्याच्या चारही बाजूंनी फीत लावायची आहे, किंवा दिव्यांची माळ लावायची आहे. तर आपल्याला किती लांबीची फीत / माळ लागेल, हे आधी कसं ठरवाल?

विद्यार्थी: माहीत नाही ?!?!

शिक्षक: चला, बघूया. समजा माझ्याकडे एका रीळातून खूप लांब दोरी आहे. मी ती दोरी फळ्याच्या एका कोपऱ्यापासून सुरू करून, वरून, मग खालून, अशी चारही बाजूंनी एकदा फिरवतो. आता जिथे दोरी परत सुरुवातीच्या ठिकाणी येऊन मिळते, तिथे मी ती कापतो. आता ही कापलेली दोरी किती लांब आहे, हे मोजलं तर काय कळेल?

विद्यार्थी: फळ्याभोवती किती फीत लागेल ते!

शिक्षक: अगदी बरोबर! पण आता एक अडचण सांगते - समजा माझ्याकडे इतकी मोठी दोरीच नाही. फक्त १५ सेंटीमीटरची पट्टी आहे. मग मी काय करू? फळ्याभोवती दोरी फिरवताच येणार नाही ना?

विद्यार्थी: मग कसं मोजायचं?

शिक्षक: हीच तर गंमत आहे! मी ही १५ सेमीची पट्टी फळ्याच्या एका बाजूवर ठेवतो, आणि ती सरकवत सरकवत त्या पूर्ण बाजूची लांबी मोजतो. मग दुसरी बाजू, मग तिसरी, मग चौथी - अशा चारही बाजू वेगवेगळ्या मोजतो. आता या चार बाजूंच्या लांबी मला मिळाल्या. पुढे काय करायचं असेल, वाटतं?

विद्यार्थी: त्या एकत्र बेरीज करायच्या!

शिक्षक: अगदी बरोबर! चारही बाजूंच्या लांबीची बेरीज केली, की तेच उत्तर मिळतं - जितकं दोरी फिरवून मिळालं असतं, तितकंच! मुलांनो, दिलेल्या कोणत्याही आकाराच्या सगळ्या बाजूंच्या लांबीची बेरीज करणे, याला आपण काय म्हणतो, माहीत आहे? याला म्हणतात - परिमिती!

चला, आता वर्गात इकडे-तिकडे बघा - आपली वही, पाटी किंवा टेबल यांची परिमिती कशी मोजाल, याचा विचार करा!

त्रिकोणी पताकेची परिमिती मोजूया

त्रिकोणी पताकेची परिमिती मोजूया

त्रिकोणी पताका

शिक्षक: मुलांनो, बघा बरं, ही पताका कोणत्या आकाराची आहे?

विद्यार्थी: त्रिकोण!

शिक्षक: अगदी बरोबर, त्रिकोण! आता समजा, आपल्याला या पताकेच्या कडांना झालर किंवा सजावटीची पट्टी चिकटवायची आहे. तर ती झालर किती लांबीची घ्यावी लागेल, असं वाटतं तुम्हाला?

विद्यार्थी: माहीत नाही ...

शिक्षक: जरा विचार करा — पताकेला किती बाजू आहेत?

विद्यार्थी: तीन!

शिक्षक: बरोबर, तीन बाजू. मग झालर या तिन्ही बाजूंवरून जाणार, हो ना? म्हणजे झालरीची लांबी ही तिन्ही बाजूंच्या लांबीइतकी हवी, बरोबर?

विद्यार्थी: हो !

शिक्षक: चला मग, आता आपली पट्टी घ्या. पहिली बाजू मोजा — किती सेंटीमीटर आहे? आता दुसरी बाजू मोजा. आणि आता तिसरी बाजू मोजा. झालं? आता या तिन्ही बाजूंच्या लांबी तुमच्याकडे आहेत. पुढे काय करायचं?

विद्यार्थी: एकत्र बेरीज करायची !

शिक्षक: अगदी बरोबर! तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज केली, की तेवढी लांबीची झालर आपल्याला त्या पताकेसाठी लागेल. मुलांनो, दिलेल्या कोणत्याही आकाराच्या सगळ्या बाजूंच्या लांबीची बेरीज करणे, याला आपण परिमिती म्हणतो, काय म्हणतो?

विद्यार्थी: परिमिती!

शिक्षक: शाब्बास! पताका वेगळ्या आकाराची असेल , लहान मोठी असेल, तर प्रत्येकाची परिमितीसुद्धा वेगळी भरेल.