रूमाल वापरून अपूर्णांकांची तोंडओळख

रूमाल वापरून अपूर्णांकांची तोंडओळख

रुमाल

शिक्षिका: मुलांनो, आता माझ्याकडे आहे एक साधा रुमाल. चला, आधी तो नीट पसरूया. आता मी त्याचे कोपरे एकमेकांवर जुळवून तिरपे दुमडते. उघडून बघा… रुमालाचे दोन समान भाग झाले! म्हणजे काय झालं?

विद्यार्थी: अर्धा!

शिक्षिका: बरोबर! त्यालाच एक छेद दोन असंही म्हणतात. दोन भागापैकी एक भाग - अर्धा - एक छेद दोन. आता मी पुन्हा तिरपे दुमडते. पुन्हा एकदा कोपरे एकमेकांवर जुळवते. आता रुमाल उघडून बघा… अरे वा! आता किती समान भाग दिसत आहेत?

विद्यार्थी: चार!

शिक्षिका: हो! म्हणजे रुमालाचा प्रत्येक भाग चार समान भागांपैकी एक भाग आहे - एक चतुर्थांश किंवा एक छेद चार आता एक मजेशीर गोष्ट लक्षात घ्या. आपण रुमाल दुमडताना कधी कडा-कडा जुळवतो, तर कधी कोपरे-कोपरे जुळवतो. पद्धत वेगळी असली तरी आपल्याला मिळालेले भाग समानच असतात.

म्हणजे समान भाग करण्यासाठी नेहमी कडा सरळ जुळवायलाच हव्यात असं नाही… कोपरे जुळवूनही आपण वस्तूचे समान भाग करू शकतो!

आता सांगा बरं- या चार समान भागांपैकी आपण दोन भाग घेतले, तर तो रुमालाचा कितवा भाग होईल?