चित्रालेख

2 युक्त्या

झाकणांच्या खेळातून चित्रालेखाची ओळख

झाकणांच्या खेळातून चित्रालेखाची ओळख

झाकणांच्या खेळातून चित्रालेखाची ओळख

शिक्षक: मुलांनो, आज मी एक गमतीशीर पिशवी घेऊन आलोय. (शिक्षक कापडी पिशवी दाखवतो, ज्यात १०-१५ बाटल्यांची झाकणे भरलेली आहेत, लाल, निळा, पिवळा, हिरवा, पांढरा असे कोणतेही पण किमान पाच रंग.) या पिशवीत वेगवेगळ्या रंगांची झाकणे आहेत. आपण आता एक खेळ खेळणार आहोत.

चला, एकेकाने पुढे या. (शिक्षक एका मुलाला बोलावतो.) न बघता, पिशवीत हात घालून एक झाकण काढायचं आहे.

(मूल हात घालून एक झाकण काढतं आणि शिक्षकाला दाखवतं.)

शिक्षक: वा! बघा मुलांनो, याने कोणत्या रंगाचं झाकण काढलंय?

विद्यार्थी: लाल!

शिक्षक: बरोबर. जर हा रंग आपण अजून फळ्यावर लिहिला नसेल, तर आधी मी फळ्यावर त्या रंगाचं नाव लिहितो. (शिक्षक फळ्यावर "लाल" असं लिहितो.) आता या रंगापुढे एक वर्तुळ काढतो. (शिक्षक "लाल" च्या पुढे एक वर्तुळ काढतो.)

आता हे झाकण परत पिशवीत टाकूया, आणि पुढच्या मुलाला बोलावूया.

(असं करत शिक्षक एकेका मुलाला बोलावतो. प्रत्येक वेळी मूल झाकण काढतं, रंग दाखवतं, तो रंग फळ्यावर नसेल तर आधी लिहिला जातो, आणि मग त्या रंगापुढे एक वर्तुळ काढलं जातं. झाकण परत पिशवीत टाकलं जातं आणि पुढचं मूल बोलावलं जातं.)

शिक्षक: आता फळ्यावर बघा, प्रत्येक रंगापुढे किती वर्तुळं आहेत?

(शिक्षक फळ्याकडे बोट दाखवतो, जिथे लाल, निळा, पिवळा, हिरवा, पांढरा या रंगांपुढे वेगवेगळी वर्तुळं काढलेली दिसतात.)

चला, प्रत्येक रंगापुढची वर्तुळं मोजूया. सगळ्यांनी माझ्यासोबत मोजा.

विद्यार्थी: लाल, एक दोन तीन... तीन वर्तुळं! निळा, एक दोन... दोन वर्तुळं!

शिक्षक: शाबास! आता ही मोजलेली संख्या मी एका तक्त्यात लिहितो. (शिक्षक फळ्यावर एक साधा तक्ता काढतो, ज्यात रंगाचं नाव आणि त्यापुढे मोजलेला आकडा लिहितो.)

आता मला सांगा, कोणता रंग सगळ्यात जास्त वेळा निघाला?

विद्यार्थी: लाल!

शिक्षक: बरोबर! आणि सगळ्यात कमी वेळा कोणता रंग निघाला?

विद्यार्थी: पांढरा!

शिक्षक: अगदी बरोबर. मुलांनो, आपण जे फळ्यावर काढलं, त्याला काय म्हणतात माहितीये का? आपण प्रत्येक रंगाची किती वेळा निवड झाली हे वर्तुळांच्या साहाय्याने मांडलं. अशा चित्रांच्या किंवा चिन्हांच्या साहाय्याने माहिती मांडण्याच्या पद्धतीला चित्रालेख म्हणतात.

चित्रालेखामुळे आपल्याला एका दृष्टीक्षेपात कळतं की कोणती गोष्ट किती वेळा घडली, कोणती सर्वात जास्त आणि कोणती सर्वात कमी.

दिवाळीच्या फराळातून चित्रालेखाचे प्रमाण

दिवाळीच्या फराळातून चित्रालेखाचे प्रमाण

दिवाळीच्या फराळातून चित्रालेखाचे प्रमाण समजून घेऊया

शिक्षक: मुलांनो, मला सांगा पाहू, पटापट, सगळ्यांनी एकदम, तुमच्या घरी दिवाळीत कुठला कुठला फराळ बनतो?

(मुले एकदम गोंधळून, मोठ्याने ओरडत सांगू लागतात. चकली, चिवडा, लाडू असा गलका होतो. शिक्षक एक-दोन मिनिटे मुलांना मोकळेपणी बोलू देतो.)

शिक्षक: शांत व्हा, शांत व्हा! आता मला एक सांगा, नक्की किती घरांत चकल्या बनतात?

(मुले गोंधळतात, कुणालाच नक्की आकडा सांगता येत नाही, कारण कुणीही मोजलेलं नसतं.)

शिक्षक: बघा, इतका गलका झाला तरी नक्की संख्या कुणालाच सांगता येईना! चला, मग आपण व्यवस्थित मोजूया.

(शिक्षक फळ्यावर एक तक्ता काढतो, त्यात चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, शेव अशी ४-५ पदार्थांची नावं लिहितो.)

आता एकेक करून विचारतो. ज्यांच्या घरी चकली बनते, त्यांनी हात वर करा.

(शिक्षक हात मोजतो, पाचाच्या पटीत येईपर्यंत मोजतो आणि तक्त्यात "चकली" पुढे तो आकडा लिहितो. असेच बाकीच्या पदार्थांसाठीही विचारतो, प्रत्येक वेळी पाचाच्या पटीत येणारी संख्या मोजून तक्त्यात लिहितो.)

शिक्षक: वा, आता बघा आपल्याकडे प्रत्येक पदार्थापुढे नक्की आकडा आहे. चकली १५, लाडू २०, असं.

आता याच तक्त्यात मी प्रत्येक पदार्थापुढे तितकी घरं काढतो, जितकी घरं त्या आकड्यात मावतील. (शिक्षक फळ्यावर उदाहरण दाखवतो.)

(शिक्षक चकलीपुढे ३ आणि लाडूपुढे ४ अशी लहान घरांची चित्रं काढू लागतो. )

शिक्षक: मुलांनो, मी अशी बरोबर घरांची चित्रं काढतोय का?

विद्यार्थी: (संभ्रमात) नाही... तुम्ही घरं कमी काढलीत !

शिक्षक: बरोबर आहे , पण त्याला कारण आहे ! आकडे मोठे असले की इतकी सगळी चित्रं एकेक काढत बसणं वेळखाऊ आणि कंटाळवाणं होतं आणि चूकही होऊ शकते.

म्हणून मी सम-समान संच केले, म्हणजे प्रत्येक ५ घरांसाठी एकच चित्र काढलं. पण मी असं एका चित्रासाठी पाच घरं धरली आहेत, हे वाचणाऱ्याला कसं कळेल?

विद्यार्थी: (विचार करत) सांगावं लागेल ना काहीतरी!

शिक्षक: बरोबर! म्हणून चित्रालेखाच्या खाली आपण नेहमी प्रमाण लिहायचं, म्हणजे "१ चित्र = ५ घरे" असं स्पष्ट लिहायचं. मग वाचणाऱ्याचा गोंधळ होत नाही, आणि त्याला लगेच कळतं की प्रत्येक चित्र किती संख्या दाखवतंय.

अशा प्रकारे कमी जागेत, कमी वेळेत आणि सहज समजेल अशा पद्धतीने मोठी माहिती चित्रालेखाच्या साहाय्याने मांडता येते.